कच्चा लिंबू ला राष्ट्रीय पुरस्कार

कालच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. निवड समितीचे अध्यक्ष शेखर कपूर यांनी काल ही घोषणा केली. त्यानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कच्चा लिंबू या चित्रपटाला मिळाला तर विशेष गुणवत्तापूर्ण चित्रपटाचा पुरस्कार मुरखीया या चित्रपटाला मिळाला.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार समजले जातात. हे पुरस्कार चित्रपट महोत्सव संचालनालया कडून प्रदान करण्यात येतात. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून निवड समिती पुरस्कारांसाठी चित्रपटांची निवड करते. नवी दिल्ली ला राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात येतात. हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला की लगेचच राष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होतो ज्यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सगळे चित्रपट प्रदर्शित होतात. या चित्रपट पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे की प्रादेशिक भाषांमध्ये असलेल्या छोट्या प्रमाणावर निर्माण केलेल्या अनेक चित्रपटांचे यात कौतुक होते आणि ते चित्रपट चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.

यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मिळाला. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या नातीगोती या नाटकाच्या कथेच्या जवळपास जाणारी वाटते. पण हे कथानक चिन्मय मांडलेकर यांनी जयवंत दळवी यांच्या ऋणानुबंध या कादंबरीवर आधारित असल्याचं सांगितलं आहे. ही एका कुटुंबाची कथा आहे.

काटदरे कुटुंबात नवरा बायको आणि त्यांच्या मतिमंद मुलगा असे तिघे राहतात. आपल्या मुलावर लक्ष ठेवण्यासाठी आई आणि वडील दोघांची धावपळ, कामाच्या बदलत्या वेळा, मुलाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पैसे साठविण्याचा प्रयत्न आणि त्यांची हतबलता हे सगळं अगदी अचूकदृष्ट्या चित्रपटातून दिसून येतं. या चित्रपटात काटदरे कुटुंबियांच्या भूमिकेत आपल्याला सोनाली कुलकर्णी, रवी जाधव आणि मनमीत पेम दिसतात तर सहाय्यक भूमिकांमध्ये सचिन खेडेकर दिसतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन नामवंत अभिनेते प्रसाद ओक यांनी केलं आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट कृष्णधवल रंगात पडदयावर येतो. याचे चित्रण अमलेंदू चौधरी यांनी केले आहे. न संपणाऱ्या समस्या, हतबल परिस्थती, अत्यंत विषण्ण परिस्थिती याचे चपखल वर्णन केवळ या कृष्णधवल रंगातूनच होते. असं असूनही हा चित्रपट उदासीनतेकडे घेऊन जात नाही. परिस्थितीपुढे न वाकण्याची त्यांनी जिद्द, सतत लढत राहण्याचा प्रयत्न आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी या चित्रपटाला आशादायक वळणावर घेऊन जातात.