नागेश भोसले – महासत्ता 2035 चा खलनायक

नागेश भोसले हे नाव ऐकलं की आपल्या समोर येतं हे उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि नेहमीची खलनायकी भूमिका. मराठी चित्रपट सृष्टीतील एक खलनायक अशी ओळख असलेल्या भोसले यांची ही ओळख कायम ठेवण्यासाठी येतोय :महासत्ता 2035‘. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार राजकीय रंग असलेल्या ह्या चित्रपटात खलनायकाची महत्त्वाची भूमिका नागेश भोसले साकारत आहेत.

नागेश भोसले मराठी चित्रपट सृष्टीतील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व आहेत. ते केवळ उत्तम अभिनेतेच नव्हे तर उत्कृष्ट दिग्दर्शक ही आहेत. अभिनय क्षेत्रात त्यांनी पदार्पण उतावळा नवरा या चित्रपटातून केले. विश्वविनायक हा चित्रपट त्यांच्यासाठी एक मैलाचा दगड ठरला कारण त्यानंतर त्यांना प्रसिद्धी आणि यश मिळू लागलं. त्यांना खऱ्या अर्थाने प्रेक्षकवर्गाने आपलंसं केलं ते म्हणजे दामिनी या मालिकेनंतर. साटंलोटं नि सगळच खोटं, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, चिमणी पाखरं, तू का पाटील, गणवेश, शासन, चिंटू यांसारख्या चित्रपटातून त्यांनी उत्तमोत्तम भूमिका वठविल्या. गोष्ट छोटी डोंगराएवढी हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील जळजळीत वास्तव प्रेक्षकांसमोर आणणारा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंक महत्त्वाचा चित्रपट ठरला. त्यांचे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनातील पदार्पण यशस्वी ठरले. ह्या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक दोन्ही वर्गांकडून कौतुकाची थाप मिळविली. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा राजकीय रंगरंगावर आधारित त्यांनी दिग्दर्शन केलेला विनोदी आणि मार्मिक चित्रपट ठरला. यात त्यांना सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे यांची उत्तम साथ लाभली. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही अभिनय केला.

सरकार, हॉस्टेल, बॉम्बे बॉयस, बिल्लू, दम, शिवा, लाल सलाम हे त्यांनी गाजविलेले काही हिंदी चित्रपट. अलीकडेच नागेश भोसले चर्चेत होते ते म्हणजे त्यांच्या हॉलिवूड पदर्पणाबद्दल. हॉटेल मुंबई हा त्यांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.

महासत्ता 2035 हा नागेश भोसले यांचा आणखी एक राजकीय चित्रपट आहे. एका होतकरू तरुणाच्या ध्येयमार्गामध्ये अडथळा आणणाऱ्या राजकीय नेत्याची भूमिका भोसले यांनी या चित्रपटात केली आहे. त्यांना नायकाच्या भूमिकेतील रामप्रभु नकाते यांची उत्तम साथ लाभली आहे. एका सामान्य माणसाच्या लढ्यात अडथळे निर्माण करणे, त्याची कुचेष्टा करणे, निंदानालस्ती करून त्याला सताविणे, त्याला सतत फसविण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारची कृत्ये करणारा हा राजकारणी नेता आहे. हा चित्रपट येत्या 18 मे ला प्रदर्शित होत आहे.