न्यूड येतोय 27 ला

‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटापासून सुरु झालेली मराठी चित्रपटसृष्टी आपल्यासमोर वेगवेगळ्या चित्रपटांतून अनेक वेगवेगळे विषय घेऊन आली. यात प्रेमकथांपासून ते चरित्रपटांपर्यंत अनेक विषय हाताळले गेले आहेत. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांनी कात टाकली ती मात्र बालक पालक या लैंगिक शिक्षण आणि पालकांच्या त्यातील सहभागावर आधारित असलेल्या चित्रपटापासून. असेच वादग्रस्त, पण प्रगल्भ विषय पडद्य्वर घेऊन येणारा दिग्दर्शक रवी जाधव याचा असाच एक चित्रपट २७ एप्रिल ला प्रदर्शित होतोय. तो म्हणजे ‘न्यूड (चित्रा)’.

झी स्टुडीओ आणि रवी जाधव फिल्म्स ची निर्मिती असणारा हा चित्रपट येत्या महिन्यात आपल्या भेटीला येणार आहे. न्यूड (चित्रा) या चित्रपटाचे कथानक कला महाविद्यालयात मॉडेल म्हणून विवस्त्र काम करणाऱ्या स्त्रीच्या आयुष्याशी निगडीत आहे. अर्थातच हे कथानक आणि ह्या नावामुळे गदारोळ उठला होता. हा चित्रपट IIFI या महोत्सवातून वगळण्यात आला होता. तसेच ४८व्या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट विभागातून हा चित्रपट हद्दपार करण्यात आला होता. गोव्याचे मुखमंत्री आणि गोवा मनोरंजन समितीचे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण सांगून या चित्रपटाला वगळले गेले होते. पण सेन्सॉर बोर्डाने जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटास कोणतीही काटछाट न करता ‘अ’ प्रमाणपत्र दिले.

या चित्रपटाचे मूल्यमापन करणारे कार्यकारी मंडळ विद्या बालन यांच्या अध्यक्षतेखाली काम करत होते. रवी जाधव यांनी याबद्दल सेन्सॉर बोर्ड आणि विद्या बालन यांचे आभार ट्वीटर वर व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च ला या चित्रपटाची पत्रकार परिषद सर जे जे कला महाविद्यालयात झाली. या वेळी जे जे महाविद्यालयात न्यूड (चित्रा) मॉडेल म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मीजी या वेळी उपस्थित होत्या. अनेक विद्यार्थी माझा आदर करतात आणि मला माझ्या कामाचं महत्त्व पटवून देतात असं त्या म्हणाल्या. माझ्या कथेवर एक चित्रपट आला आहे याबद्दल मला खूप आनंद आहे असेही या वेळी त्या म्हणाल्या. अशा विषयांवरील चित्रपट आपल्याला अनभिज्ञ आशा दुनियेचं दर्शन घडवतात यात शंका नाही. अनेक कलाकारांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून या चित्रपटाला आपला पाठिंबा दिला आहे.

अनेक वादन्गांतून जाऊन हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा करूया.