बालप्रेक्षकांसाठी मंकी बात

सुट्टीचा काळ म्हणजे लहानग्यांची मौजच असते. या काळात काही लोकं फिरायला जातात तर काही लोकं इतर गोष्टी करून आपली सुट्टी सार्थकी लावत असतात. एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान लहान मुलांचे मनोरंजन करणाऱ्या बालनाट्यांची रेलचेल असते. या वर्षी त्यात अजून एक भर पडणार आहे ती म्हणजे ‘मंकी बात’ ची! मंकी बात हा आगामी चित्रपट लहान प्रेक्षकांसाठीच निर्माण करण्यात आला आहे.

लहान मुलांसाठी पूर्वी दूरचित्रवाणी वर खूप सुंदर कार्यक्रम लागायचे. आता त्यांची संख्या त्या तुलनेत कमी झाली आहे. पण जादू मात्र तितकीच आहे. गेल्या काही वर्षांत आलेल्या चिंटू आणि चिंटू 2 या चित्रपटांना लहानग्या प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. या वर्षी त्यांचे मनोरंजन करण्यासाठी येतोय ‘मंकी बात’! मंकी बात हा लहान मुलांसाठीचा चित्रपट 18 मे ला प्रदर्शित होतो आहे.

उत्क्रांतिवाद उलटा झाला तर काय होईल अशा आशयाचा हा चित्रपट असेल. ‘डार्विनचा सिद्धांत उलटा होणार, माणसाचं पुन्हा माकड होणार’ अशा ओळीसकट या चित्रपटाचं पाहिलं पोस्टर हल्लीच प्रदर्शित झालं.

चित्रपटाच्या मोशन पोस्टर मध्ये माकडापासून माणसापर्यंतची उत्क्रांती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला माणसापासून माकडपर्यंत प्रवास दाखविला आहे. ,माणूस सध्या पशूंनाही लाजवेल असे वर्तव्य करत असल्याने अशा प्रकारचा संदेश देण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा विजू माने यांनी सांभाळली आहे. कथा पटकथा आणि संवाद देखील विजू माने यांचेच आहेत या चित्रपटाची गीते संदीप खरे यांनी लिहिली आहेत तर डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. अगगोबाई धगगोबाई, आयुष्यावर बोलू काही आणि चिंटू नंतर ही महाराष्ट्राची लाडकी जोडगोळी परत एकदा एकत्र येते आहे. या दोघांमुळे या चित्रपटातील गीते दर्जेदार असतील यात काहीच शंका नाही.

डार्विनचा सिद्धांत उलटा होणार, माणसाचं पुन्हा माकड होणार. अशी हटके पंचलाईन असलेल्या मोशन पोस्टरमुळे ‘मंकी बात’ बद्दल सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे लहान मुलांनीच लहान मुलांसाठी हा चित्रपट तयार केला आहे. लहान मुलांचं लक्ष वेधून घेणारं आणि त्यांना गुणगुणावसं वाटणारं संगीत ही संदीप – सलील या जोडीची खासियत आहे आणि ती या चित्रपटाच्या बाबतीतही काम करेल यात शंका नाही. हा चित्रपट आकाश पेंढारकर आणि विनोद सातव प्रस्तुत करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती निष्ठा प्रोडक्शन च्या माध्यमातून विवेक डी., रश्मी करंबेकर, मंदार टिल्लू आणि विजू माने यांनी केली आहे. छोट्या प्रेक्षकांना हा चित्रपट किती पसंत पडतो हे बघायला आता 18 मे चीच वाट बघावी लागेल.