देवयानी मुव्हीजचे संस्थापक मच्छिंद्र चाटे यांचा महत्वाकांक्षी चित्रपट ‘तु. का. पाटील’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात तब्बल १७ गाणी असणार आहेत. त्यातील बहुतांश गाणी youtubeवर प्रदर्शित हि करण्यात आलेली आहेत. त्यात लावण्या, युगल गीत, प्रार्थना, वग अशा सर्व प्रकारच्या गीतांचा समावेश आहे.

           मच्छिंद्र चाटे यांच्या मते, “मराठीत बरेच सिनेमे बनतात, पण त्यातील बहुतांश सिनेमे हे शहराकडच्या किंवा उच्चशिक्षित लोकांना पटतील रुचतील अशाच पद्धतीचे बनवले जातायत. म्हणून ते स्वतः ग्रामीण बाज असलेला चित्रपट बनवू इच्छित होते.” ‘तु.का.पाटील’ हा चित्रपट मराठी संस्कृतीचा अभिमान उंचावणारा ठरेल अशी आशा मच्छिद्र चाटे यांना आहे.  नागेश भोसले यांनी आजवर अनेक चांगल्या भूमिका करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. या चित्रपटात ते तुकाराम काशिनाथ पाटील यांच्या दमदार भूमिकेत, आपल्या अभिनयाचा अजून एक ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालेले आहेत.

           मच्छिंद्र चाटे यांनी या आधी बिनधास्त आणि चिमणी पाखरं या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. बिनधास्त या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी तर चिमणी पाखर या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं. देवयानी मूव्हिजचा आगामी संगीतप्रधान चित्रपट ‘तु. का. पाटील’ याचं दिग्दर्शन आणि निर्मिती  स्वतः मच्छिंद्र चाटे यांनी केलेली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद केशव काळे यांनी लिहिलेले आहेत. तर संगीतकार आहेत राजेश सरकटे. चित्रपटातील १४ गाणी योगिराज माने यांनी लिहिलेली आहेत, तर उर्वरित 3 गाणी मराठी पारंपरिक गीतांना नवीन चाल देऊन बनविण्यात आलेली आहेत. यासाठी गायक सुरेश वाडकर, साधना सरगम, सुनिधी चौहान, राजेश सरकटे, स्वप्नील बांदोडकर, अमृता फडणवीस, बेला शेंडे, नितीन सरकटे, आशिक नाटेकर, वैशाली देशमुख, संगीता भावसार, यांनी पाश्र्वगायन केले आहे. नृत्य दिग्दर्शनाची बाजू डॉ. किशू पाल आणि उमेश जाधव यांनी सांभाळली असून, चित्रपटाचं छायांकन केलंय राहुल जाधव यांनी, तर  संकलन केलंय जफर सुल्तान यांनी, कला दिग्दर्शन सुधीर तारकर, वेशभूषा क्रांती चाटे व सहदिग्दर्शकाची भूमिका पार पाडलीय भारती नाटेकर यांनी.

या चित्रपटात नागेश भोसले, प्रिया बेर्डे, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, मैथिली जावकर, अशोक शिंदे ,सिद्धेश्वर झाडबुके, संदीप पाठक, सुकन्या काळण, हरीश दुधाडे यासारखे मातब्बर कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती-जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.