रसूल पुकुटी यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार

‘क्षितीज: अ होरायझन’ हा अलीकडेच चर्चेत असणारा दर्जेदार मराठी चित्रपट. या चित्रपटाच्या ध्वनी अभियांत्रिकी साठी रसूल पुकुट्टी यांना नुकताच महाराष्ट्र राज्य पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी हि खुशखबर सगळ्यांना ट्वीटर वरून कळवली.

पुकुटी हे प्रतिभावंत ध्वनी संपादक आहेत. त्यांनी हॉलीवुड मध्ये तसेच हिंदी आणि मल्याळम सिनेमा च्या ध्वनीचे काम पाहिले आहे. त्यांनी विधी महाविद्यालयातून एल एल बी करत असतानाच त्यांनी फिल्म अँन्ड टेलीव्हीजन इन्स्टीट्युट,पुणे येथून ध्वनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कामाच्या शोधात मुंबईला आले. १९९७ सालच्या प्रायव्हेट डीटेक्टीव्ह हा त्यांच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट. पण त्यांना खरी ओळख मिळाली ते संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक या चित्रपटामुळे. त्यानंतर त्यांनी मुसाफिर, ट्राफिक सिग्नल, गांधी – माय फादर, सावरिया, हायवे यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांची ध्वनी अभियांत्रिकी केली. स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटाच्या ध्वनी साठी त्यांना रिचर्ड प्रिक आणि आयन टॅप यांच्याबरोबर सर्वोत्तम ध्वनी साठी अकादमी पुरस्कार मिळाला. याच चित्रपटासाठी त्यांना बाफ्ता पुरस्कारही मिळाला.

२०१२ साली त्यांना रा. वन या चित्रपटाच्या ध्वनिसाठी झी सिने पुरस्कार मिळाला. २००५ सालीही त्यांना हाच पुरस्कार मुसाफिर या चित्रपटासाठी मिळाला होता. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांच्या ध्वनी चे काम पहिले आहे. त्यांना पझास्सी राजा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. भारतीय शासनाने २०१० साली त्यांना पद्मश्री देऊन त्यांच्या या योगदानाचा सन्मान केला.

२०१४ साली त्यांनी अर्धवट सोडलेले विधीचे शिक्षण पूर्ण करून आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली. मनोज कदम यांचे दिग्दर्शन असणारा ‘क्षितीज: अ होरायझन’ या चित्रपट सध्या अनेक चित्रपट महोत्सव गाजवतोय. इंडिअन पनोरमा चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली होती. आय एफ एफ आय या चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला युनेस्को गांधी मेडल ने गौरवण्यात आले. या चित्रपटाचा विषय शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या समस्यांशी निगडीत आहे. एका शेतकरी कुटुंबाची हि कथा आहे. कर्जबाजारी झालेल्या एक शेतकरी उदरनिर्वाहार्थ शहरात येतो आणि त्यावेळच्या त्यांच्या आयुष्याचे चित्रण उत्तम रितीने या चित्रपटात केले आहे. मनोज जोशी, विद्याधर जोशी, उपेंद्र लिमये, संजय मोने असे दिग्गज प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट आहे. रसूल पुकुटी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच मराठी चित्रपट सृष्टीने त्यांच्या कामाचा गौरव केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.