राजा परांजपे चित्रपट महोत्सव १४ एप्रिल पासून

राजा परांजपे चित्रपट महोत्सव १४ एप्रिल पासून सुरु होत आहे. ७ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सांगता २० एप्रिल ला होईल. कोल्हापूर येथील केशवराव भोसले सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.

राजा परांजपे चित्रपट महोत्सव हा राजा परांजपे प्रतिष्ठान, पुणे यांच्या तर्फे आयोजित केला जातो. राजा परांजपे यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान जगासमोर यावे म्हणून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. हा महोत्सव प्रथमच कोल्हापुरात होत आहे. गेली अनेक वर्षे हा महोत्सव पुण्यात होत होता. या वर्षी राजा परांजपे यांची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय असण्याऱ्या दहा चित्रपटांचे प्रदर्शन होईल.

राजाभाऊ परांजपे यांचा जन्म मिरज येथे झाला. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे.

अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक अश्या चौरस भूमिका त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पुणे हि त्यांची कर्मभूमी ठरली. ४० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक एकाहून एक सरस अशा चित्रपटांची निर्मिती केली. या कालखंडात त्यांनी सुमारे ८० चित्रपटांचे काम केले आहे. जरा जपून, पुढचं पाउल, लाखाची गोष्ट, आंधळा मागतो एक डोळा, गंगेत घोडे नाहले, पसंत आहे मुलगी, जगाच्या पाठीवर, सोनियाची पाऊले, पाठलाग अशा मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.

जगाच्या पाठीवर हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला होता आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर गरुड करून बसला आहे. कान्होपात्रा, माणूस, सूनबाई, रागरंग, इन मीन साडेतीन, सासुरवास या चित्रपटांतील त्यांचा अभिनय अविस्मरनीय असा राहील. पिया का घर, उस पार, जल बिन मछली नृत्य बन बिजली, अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. मेरा साया हा त्या वेळी गाजलेला चित्रपट पाठलाग या मराठी चित्रपटची पुनर्निर्मिती होता.

या महोत्सवाची धुरा राजा परांजपे यांची नात आणि राजा परांजपे प्रतिष्ठानच्या ट्रस्टी अर्चना राणे सांभाळत आहेत. त्यांनी नुकतीच कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन वरील घोषणा केल्या. या व्यतिरिक्त या महोत्सवात राज दत्त यांचा त्यांच्या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल गौरव करण्यात येईल. त्यांना जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर संजय नार्वेकर आणि निर्मिती सावंत यांचा अभिनय, अवधूत गुप्ते यांचे संगीत आणि संजय मापुस्कर यांचे दिग्दर्शन यासाठी त्यांना ‘राजा परांजपे सन्मान’ देण्यात येईल.