रॉकलाईन वेंकटेश करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

मराठी चित्रपटांची निर्मिती दुसऱ्या यशस्वी निर्मात्यांनी करणं ही आता तितकीशी आश्चर्य जनक बाब राहिली नाहीये. नवनवीन विषय, प्रगल्भ मांडणी आणि उत्कृष्ट सादरीकरण यामुळे मराठी चित्रपट रोज यशाची नवीन शिखरे सर करतो आहे. याची पोचपावती म्हणून सतत अमराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मराठी चित्रपटातील आपली आवड दाखवत असतात. नुकतीच अशी घोषणा झाली की रॉकलाईन वेंकटेश एक मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

रॉकलाईन वेंकटेश हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम निर्माते आहेत. त्यांचे मूळ नाव टी एन वेंकटेश असे आहे पण ते रॉकलाईन वेंकटेश या नावानेही प्रसिद्ध आहेत. रॉकलाईन एंटरटेनमेंट या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम या चारही दाक्षिण्यात भाषांतील चित्रपटांची निर्मिती केली आहे. वेंकटेश यांनी चित्रपटसृष्टीत साहसी कलाकार म्हणजेच स्टंटमन म्हणून पदार्पण केले होते. त्या वेळी एका कन्नड मालिकेमध्येही त्यांनी काम केले.

Remake Of Sairat

1996 साली त्यांनी सहनिर्मित केलेला ‘अर्जुन’ हा त्यांचा चित्रपट निर्मितीतील पहिला प्रयत्न.  विष्णुवर्धन, अंबरीश, शिवराज कुमार, रवीचंद्रन, उपेंद्र अशा दाक्षिणात्य अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. याचबरोबर त्यांनी अत्यंत यशस्वी आशा दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे.

परिणामतः रॉकलाईन एंटरटेनमेंट हे कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात आघाडीचं नाव आहे. 2014 साली त्यांनी निर्माते म्हणून तामिळ चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. पावर हा त्यांची निर्मिती असलेला पहिला तामिळ चित्रपट. 2015 मध्ये सलमान खान यांच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाची सहनिर्मिती वेंकटेश यांनी केली होती. या चित्रपटाने खूप नफा आणि प्रसिद्धी मिळवली. 2016 मध्ये सैराट या मराठी चित्रपटाच्या कन्नड, तामिळ, तेलगू आणि मल्याळम रिमेकचे हक्क त्यांना  मिळाले. वेंकटेश यांच्या नावाखाली हे चित्रपट यशस्वी होतील यात काही शंका नाही. 2017 मध्ये रॉकलाईन च्या पहिल्या मल्याळी चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. लवकरच तो चित्रपटही प्रदर्शित होईल.

Rockline Vyankatesh And Salman Khan

वेंकटेश निर्मिती करत असलेल्या सिनेमाचे नाव ‘तो, ती आणि तिसरा’ असे आहे.दिलीप कुमार चित्रपट दिग्दर्शित करतील व चित्रपटात आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी पाहायला मिळेल. सहकलाकाराचे नाव घोषित केले नसल्याने प्रेक्षकवर्गाची त्यासाठीची उत्सुकता मात्र ताणलेलीच आहे.सचिन कांबळे हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. कन्नड चित्रपटसृष्टीतील सिनेमॅटोग्राफर अशोक कश्यप चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहेत. या चित्रपटाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली.