मराठी सिनेमा अनेक नवनवीन विषय पडदयावर घेऊन येत असतो. क्वचितच कोणत्या प्रादेशिक चित्रपटसृष्टीत इतके प्रयोग केले गेले असतील. राजा हरिश्चंद्र सारख्या पुराणकथांवर आधारित चित्रपटांपासून ते अत्यंत वेगळ्या पठडीच्या आणि सामाजिक संदेश देण्याऱ्या सैराट पर्यंत, मराठी सिनेमा ने खूप मोठी मजल मारली आहे. बालक पालक, फँड्री, काकस्पर्श, कट्यार काळजात घुसली हे सरळसोट साच्याला भेद देऊन प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे सिनेमे ठरले. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी रवी जाधव यांचा न्यूड हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होतोय. सगळीकडे त्याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. याचबरोबर आणखी एका प्रौढ सिनेमाच्या नावाने जोरदार वावटळ उठली आहे. तो चित्रपट म्हणजे शिकारी

काही महिन्यांपूर्वी महेश मांजरेकर यांनी एक पोस्टर चाहत्यांबरोबर शेअर करून त्याखाली लिहिलं होतं की :एप्रिल महिन्यात heat वाढणार’. त्यावेळी या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नव्हती. पण नुकताच सुव्रत जोशीने या चित्रपटाबद्दल खुलासा केला.

शिकारी हा केवळ प्रौढांसाठी असणारा हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे तर निर्मिती विजय पाटील यांची आहे. विजू माने यांनी यापूर्वी गोजिरी आणि बायोस्कोप यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. महेश मांजरेकरभ चित्रपट सहनिर्मित करत आहेत. महेश मांजरेकर आणि अश्वमी एंटरटेनमेंट या दोन नावांना तर प्रस्तावानेची काहीच गरज नाही. पण सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमकथांच्या कचाट्यात सापडलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी वेगळ्या वाटा दाखवल्या. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सारख्या चित्रपटांनी वादळ उभं केलं आणि ‘दे धक्का’ सारख्या कौटुंबिक चित्रपटांनी हसता हसता रडवलं. आता येणार शिकारी हा चित्रपटही वेगळ्या पठडीतला आहे. 20 एप्रिल ला प्रदर्शित होणारा आणि प्रौढांसाठी राखीव असलेला हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाहीये. त्यात एक दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यात येत आहे. अनेक जण झगमागटाला भुलून रुपेरी दुनियेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. पण असे करताना काय काय होऊ शकतं याचं चित्र ‘शिकारी’ मध्ये चितारलं आहे. या चित्रपटात नेहा खान, सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, काश्मिरा शाह, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, भालचंद्र कदम, वैभव मांगले,संदेश उपश्याम, जीवन करलकर, दुर्गेश बडवे, भारत गणेशपुरे यासारख्या नव्या दमाचे चेहरे आणि अनुभवी दिग्गज मंडळी यांचा मेळ दिसणार आहे.

यांना काय म्हणायचंय हे कळायला शिकारी बघायलाच हवा!