संस्कृती कलादर्पण महोत्सवात कॉपी

मराठी चित्रपटांनी विविध चित्रपट महोत्सवात झेंडे फडकवणं हे आता नवीन राहिलं नाहीये. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयालाही स्पर्श करून जात आहेत. केवळ प्रेक्षकच नव्हे तर समीक्षकांच्याही पसंतीस उतरत आहेत. याआधीही कितीतरी सिनेमांनी विविध महोत्सवांत सहभागी होऊन प्रदर्शना आधीच हवा निर्माण केली होती. अलीकडेच त्यातला एक चित्रपट म्हणजे रवी जाधव यांनी दिग्दर्शन केलेला न्यूड- चित्रा. आता यात अजून एक चित्रपटाची भगर पडली आहे तो म्हणजे कॉपी!

कॉपी या चित्रपटाचे या आधी वेगवेगळ्या महोत्सवात प्रदर्शन झाले आहे आणि या चित्रपटाचा आधीपासूनच खूप गवगवा निर्माण झाला आहे. या चित्रपटाचे अधिकृत प्रदर्शन लवकरच होईल. पण त्या आधी हा चित्रपट संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येईल. संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सवाचे यंदा हे 18 वे वर्ष आहे.

या वर्षी या महोत्सवात कॉपी बरोबरच गच्ची, रडू, मांजा आणि नदी वाहते हे चित्रपटही दाखवण्यात येतील. या महोत्सवाच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आहेत. दरवर्षी संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सवाच्या आधी संस्कृती कलादर्पण नाट्य गौरव रजनी हा नाटकांचा महोत्सवही होतो.

याआधी या चित्रपटाची निवड आशियाई चित्रपट महोत्सवात झाली होती. इतकेच नव्हे तर 55व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्कारासाठी नामांकानही मिळविले होते.   केवळ भारत आणि आशियाई चित्रपट महोत्सव गाजवून झाले नाहीत की काय म्हणून या चित्रपटाने लॉस अंजलेस सिने महोत्सवाच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती.

कॉपी या चित्रपटाची निर्मिती गणेश रामचंद्र पाटील यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत दाभाडे यांनी केले आहे. कॉपी हा चित्रपट या आधी कधीही न हाताळल्या गेलेल्या विषयावर भाष्य करतो. या चित्रपटाचे कथानक शैक्षणिक खात्याच्या गैरव्यवहारावर आधारित आहे. या शैक्षणिक खात्याच्या हाताखाली अनेक गावांतील छोट्या छोट्या शाळा असतात. कोणत्याही एका गावावर भाष्य न करता एकंदरच शिक्षण खात्याचा उडालेला गोंधळ आणि त्यामुळे शाळांचा आणि शिक्षणाचा खालावलेला दर्जा आणि विद्यार्थ्यांची होणारी परवड यांचे मार्मिक चित्र या चित्रपटात रेखाटले आहे. शिक्षण खात्यातील गोंधळ हा विषय सगळीकडे थोड्याफार फरकाने सारखाच असल्यामुळे या चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दाखविली आहे. अनेक अनुभवी दिग्दर्शक आणि निर्माते हा चित्रपट पाहून प्रभावित झाले होते. मिलिंद शिंदे, अंशुमान विचारे, जगन्नाथ निवांगुणे, कमलेश सावंत, राहुल बेलापूरकर, अनिल नगरकर, विद्या भागवत, प्रतीक्षा साबळे, पूनम राणे, आशुतोष वाडकर, श्रद्धा सावंत अशी नव्या चेहऱ्यांची ताकदवान फळी या चित्रपटात आपल्याला बघता येईल. या चित्रपटाला रोहन यांचे संगीत लाभले आहे.