सावनी रवींद्र ने गायले तमिळ गाणे

होणार सून मी ह्या घरची या मालिकेची आठवण झाली म्हणजे आपल्याला तिचे शीर्षकगीत आठवल्याशिवाय रहात नाही. या गीतामुळे घराघरात पोहोचलेली सावनी रवींद्र हिने नुकतेच एका तमिळ सिनेमा साठी पार्श्वगायन केले. “कोट्टली” या चित्रपटातील गाण्याचे पार्श्वगायन तिने केले आहे. अलीकडेच त्यातील पहिले गाणे प्रदर्शित झाले.

त्याबद्दल बोलताना सावनी म्हणाली कि तिने या आधीहि तमिळ गाणी गायली आहेत पण चित्रपटासाठी नाही. तिने युट्युब वर अनेकदा हि गाणी गायली आहेत. ती म्हणाली कि तमिळ भाषा थोडी कठीण असल्याने तिला मराठी गाण्यापेक्षा जास्त वेळ तमिळ गाण रेकॉर्ड करायला लागतो. तिला तमिळ समजते पण बोलता येत नाही त्यामुळे हे गाणं एक आव्हान होतं असं ती म्हणाली. त्याचप्रमाणे कर्नाटकी संगीतावर आधारित हे गाणं असल्याने गायनाचा हा वेगळा प्रकार अनुभवायला मिळाला. एकाच आठवड्यात तिची दोन तमिळ गाणी प्रदर्शित झाली आहेत.

सावनीचा सांगीतिक प्रवास तिच्या घरातून सुरु झाला. तिचे आई वडील संगीताचे जाणकार असल्यामुळे त्याच्या घरे अनेक दिग्गजांचं येणं जाणं असायचं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या तालमीत तयार होऊन सावनी त्यांच्याबरोबर वयाच्या १४ व्या वर्षापासून गाऊ लागली.  केवळ पंडित हृदयनाथ मंगेशकरच नव्हे तर रवींद्र जैन, रवींद्र साठे, अरुण दाते, सुरेश वाडकर अशा अनेक दिग्गजांबरोबर तीन काम केले आहे.

तिच्या मते अशा अनुभवी लोकांबरोबर काम करतान छोट्या छोट्या गोष्टींबद्दल खूप काही शिकायला मिळतं.

तिच्यामते रीअॅलिटी शो मधुन बाहेर पडल्यावर कलाकारांचा खरा संघर्ष सुरु होतो. शो चालू असताना तो प्रसिद्धीझोत तात्पुरता असतो. पण खर्या अर्थाने यशस्वी होण्याचा प्रवास त्या शो नंतर सुरु होतो. सा रे ग म प संपल्यानंतर वेगळे प्रयोग करण्यासाठी तिने युट्युब चा आधार घेतला. तिच्या मते चाहत्यांच्या समोर राहण्यासाठी या माध्यमांचा चांगला उपयोग होतो. येत्या वर्षात तिचं “काय रे रास्कला” या चित्रपटातील “मोनालिसा” हे गाणं प्रदर्शित होईल. सावनी म्हणते कि आजकालची पिढी पॉप आणि रॉक ऐकत असलीतरी जुन्या गाण्यांची गोडी अवीट आहे आणी म्हणून ती गाणी अजरामर आहेत.

सावनीच्या मते संगीताने तिचं संपूर्ण जीवन भरलं आहे. संगीतच तिचा श्वास आहे. संगीत नसतं तर काय केलं असतं हा प्रश्न कधी कधी तिला सतावतो. चाहत्यांच्या प्रतिक्रिया संगीताला रोजच्या कामाबद्दल चांगली भावना देतात असंही ती म्हणाली.