बॉलीवूड शिकतंय मराठी

एखादे पात्र साकारण्यासाठी अभिनेत्याला केवळ अभिनय करून चालत नाही. प्रत्येक अभिनेता त्याला देण्यात आलेले पात्र पडद्यावर साकार करण्यासाठी त्या भूमिकेवर मेहनत घेत असतो. काही भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते तर काही भूमिकांसाठी वजन घटवावे देखील लागते. अभिनेते ज्या पात्राची भूमिका साकारणार असतात त्यानुसार त्यांना त्यांच्या शरीरयष्टी मध्ये बदल करावे लागतात ,बोलीभाषेत सुद्धा बदल करावे लागतात ,बोलण्याची शैली ,भाषा अशा सर्वच बाबतीत बदल करणे गरजेचे असते.चित्रपटाला मिळणाऱ्या यशात यांसारख्या लहान वाटणाऱ्या गोष्टींचाही मोलाचा वाटा असतो.

शारीरिक बदलांबरोबरच अभिनेत्यांमध्ये ते साकारत असलेल्या भूमिकेसारखे मानसिक बदलही होत असतात. हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये आपल्याला अशा प्रकारे आपल्या भूमिकांवर खास बारकाईने अभ्यास करून , निरीक्षण करून मग ते पात्र साकारणारे अनेक चेहरे दिसतील. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या भूमिकेसाठी मराठी भाषेचा अभ्यास केलेला आहे आणि यात अनेक बड्या कलाकारांचा देखील समावेश आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी‘ या चित्रपटासाठी खास पेशवाई मराठीचे धडे गिरवले होते आणि याची झलक आपल्याला चित्रपटात पाहायला मिळते. याच चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंग यानेही पेशवाई मराठीचा अभ्यास केलेला. प्रियांका चोप्रा हिने तिची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर‘ या चित्रपटासाठी बाबा हे मराठी गाणे गायले होते. गाण्यातील शब्दोच्चार व्यवस्थित यावेत यासाठी तिने त्यावर काम केले होते.

सलमान खान यांची पाहुणे कलाकार म्हणून झलक आपल्याला ‘लय भारी‘ या मराठी चित्रपटात पहायला मिळते, यात त्यांच्या तोंडी काही मराठी संवाद आहेत. हिंदी चित्रसृष्टीत अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील जिथे अभिनेत्याने त्याच्या भूमिकेसाठी मराठीचे धडे गिरवले. बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी देखील सरकार या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी मराठी भाषा शिकली होती. अर्जुन कपूर देखील आगामी पानिपत या सिनेमासाठी मराठीचे धडे गिरवतो आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी देखील लालबाग, परळ, दादर या भागांमध्ये चित्रीकरण करताना मिळणाऱ्या वेळात मराठी शिकत आहेत. त्यांच्या आगामी लघुपटासाठी त्यांनी ही भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. आज अनेक अमराठी कलाकारही मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ज्या भाषेत काम करत आहेत किंवा पात्राची मातृभाषा थोडीफार यावी म्हणून अनेकदा कलाकारांना भाषेचे धडे गिरवावे लागतात. तो त्यांचा कामाचा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचाच एक भाग असतो.