तयार व्हा सायकल सफरीला

चित्रपट ही कलाकृती अनेक मेहेनतींमधून तयार होते. चित्रपटाच्या यशासाठी निर्मिती प्रकियेत बारकाईने लक्ष घालणे तर महत्वाचे असतेच परंतु त्याच बरोबर चित्रपटाची प्रसिद्धी प्रक्रिया देखील महत्त्वाची असते.जाहिरात , वर्तमानपत्र , आकाशवाणी ,दूरचित्रवाणी संच या माध्यमातून  आधी प्रसिद्धी केली जायची पण आता अजूनही अनेक युक्त्या प्रसिद्धी साठी वापरल्या जाऊ लागल्या आहेत. विविध वाहिन्यांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांतुन, सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होऊन अनेक कलाकार प्रसिद्धी करतात. युवा कलाकार प्रसिद्धी साठी वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रसिद्धी करण्यास पसंती  दर्शवतात. प्रसिद्धीची ही नवनवीन तंत्रे हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच  मराठी चित्रपटसृष्टीतही रुजताना दिसत आहेत. प्रसिद्धी साठी अशाच एका अनोख्या तंत्राचा वापर मराठी चित्रपटसृष्टीतील येऊ घातलेल्या ‘सायकल‘ च्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आला

सायकल चित्रपट

प्रकाश कुंटे यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘सायकल‘ असे असून हा कुंटे यांनी दिग्दर्शित केलेला चौथा चित्रपट आहे. अदिती मोघे यांनी ‘सायकल‘ या चित्रपटासाठी लेखन केले आहे. सायकल ही केशवराव या सर्वसामान्य माणसाची कथा आहे. चित्रपटातील नायक असलेल्या केशवराव यांची सायकल चोरीला जाते व ती सायकल शोधण्यासाठी , परत मिळवण्यासाठी केशवराव यांनी केलेले प्रयत्न आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळतील. सायकल  ही एक हलकीफुलकी विनोदी कलाकृती आहे. सर्व सामान्य माणसांवर अगदी लहान व साध्या गोष्टींचा प्रभाव कसा पडतो हे आपल्याला या चित्रपटात दिसेल.

सायकलचित्रपटाची प्रसिद्धी

प्रसिद्धी वेगळ्या प्रकारे केल्यास चित्रपटाकडे प्रेक्षकांचे जास्तीत जास्त लक्ष वेधले जाईल हे लक्षात घेऊन  ‘सायकल‘ या चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या सायकल रॅली मध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांबरोबरच चित्रपटातील अभिनेते प्रियदर्शन जाधव ,हृषीकेश जोशी ,दीप्ती लेले ,सोनाली खरे ,अमृता खानविलकर ,तितीक्षा तावडे ,प्राजक्ता माळी यांचाही सहभाग होता. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ही सायकल रॅली चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी असल्याने यात सहभागी होणाऱ्या सगळ्यांनी एकसारखा पेहराव केलेला. सर्व जण पिवळ्या रंगाच्या व त्यावर ‘सायकल’ हे चित्रपटाचे नाव लिहिलेल्याअशा टी-शर्ट मध्ये या रॅली मध्ये सहभागी झाले होते. या रॅली मुळे अनेक प्रेक्षकांचे लक्ष आधीच ‘सायकल‘ या चित्रपटाकडे वेधले गेले आहे. याचा उपयोग चित्रपटाला  तिकीतबारीवर अधिकाधिक यश मिळवायला नक्कीच होईल.