लग्न मुबारक येतोय 11 मे ला

मे महिन्याचा पहिला आठवडा चोखंदळ प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 11 मे ला बॉलीवूड मधला उत्कंठावर्धक चित्रपट राज़ी प्रदर्शित होतोय. पण हिंदी चित्रपट सृष्टीच्या मागे राहील ती मराठी चित्रपट सृष्टी कसली! म्हणूनच त्या दिवशी आणखी एक मराठी चित्रपट प्रदर्शित  होतो आहे. तो चित्रपट म्हणजेच लग्न मुबारक.

राजकीय रागरंग असणारी प्रेमकथा असं या चित्रपटाचं थोडक्यात वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्यातील प्रेम संबंध आणि आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव दर्शविणारा असा हा चित्रपट आहे. नुकताच ह्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत. अभय पाठव प्रॉडक्शन्स सहप्रस्तुत करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती आरव प्रॉडक्शन्स ने केली आहे. टीझर मध्येच विषय उलगडावा म्हणून दिग्दर्शकांनी काही शायरींचा वापर केला आहे. ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है,  जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ , ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है,  जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा दमदार शायरीमुळे टीझर हिट झाला आहे

सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ, सुरज चव्हाण आणि जयेश दळवी लग्न मुबारक हा आगामी चित्रपट सहनिर्मित करत आहेत. अभय पाठक आणि अजिंक्य जाधव आपल्यासाठी हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत.   चित्रपट येत्या ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लग्न मुबारक या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक या जोडगोळीने केले आहे.

लग्न मुबारक मध्ये आपल्याला ज्वलंत असा जातीयवाद दाखविला गेला आहे. दोन्ही वेगवेगळ्या धर्माच्या असलेल्या प्रेमी युगुलाच्या पार्श्वभूमीवर अनेक जातीय वाद उद्भवतात. अनेक लोकं केवळ स्वतःच्या फायद्यासाठी जातीयवादाचा कसा वापर करून घेतात याचं उदाहरण म्हणजे लग्न मुबारक चित्रपट. या चित्रपटात संजय जाधव, प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा, गौरव रोकडे अशी अनेक अनुभवी आणि अनेक नवीन अशा दोन्हीची सांगड आपल्याला मिळेल. या चित्रपटात मराठी बिग बॉस आणि अभिनेते महेश मांजरेकर विशेष भूमिकेत दिसून येतील. लग्न मुबारक ची गाणी अक्षय कर्डक यांनी शब्दबद्ध केली आहेत. त्यांना उत्तम संगीताची जोड साई – पियुष,  ट्रॉय अरिफ यांची लाभली आहे.