अक्षय कुमार बनणार ‘चुंबक’ या मराठी चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता

आशयघन मराठी चित्रपटांची मोहिनी जगाला भुरळ घालत असतानाच खिलाडी अक्षय कुमार आकर्षित झालेला आहे, अशाच एका हृदयस्पर्शी मराठी चित्रपटाकडे, ज्याचं नाव आहे ‘चुंबक’. चुंबक हा चित्रपट एका १४ वर्षीय महत्वकांक्षी मुलगा ‘बाळू’ आणि त्या मुलाच्या आयुष्यात आलेल्या ४१ वर्षीय गतिमंद व्यक्ती ‘प्रसन्नची’ गोष्ट सांगतो. अक्षयला या चित्रपटाची कथा, त्यातील पात्र इतकी भावली कि त्याने हा चित्रपट प्रस्तुत करायचं ठरवलं. हा चित्रपट येत्या २७ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

       काल अक्षय ने twitterवर एक video शेयर केला, ज्यात त्याने प्रेक्षकांशी मराठीत संवाद साधत चित्रपटाविषयीचं त्याचं मत व्यक्त केलं. स्वभावातील सच्चेपनासाठी प्रसिध्द असलेल्या अक्षय कुमारने चित्रपटाची केलेली स्तुती हि काही इतर कलाकारांनी फक्त प्रसिद्धीसाठी केलेल्या बाष्कळ संवादांच्या बुडबुड्यासारखी नाही, हे सुज्ञ व्यक्तींच्या लक्षात येईल.

या चित्रपटाच्या निमित्ताने ३ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती एकत्र आलेले आहेत, स्वतः अक्षय कुमार, या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप मोदी आणि प्रख्यात लेखक, गायक, अभिनेता आणि गीतकार स्वानंद किरकिरे. हा चित्रपट २०१७ सालच्या MAMI फिल्म फेस्टिवलमध्ये दाखविण्यात आला होता.

आपण सगळे जाणतोच कि २ चुंबकांचे परस्पर विरोधी ध्रुव म्हणजेच दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव एकत्र आले कि ते एकमेकांकडे आकर्षित होतात. आणि २ चुंबकांचे एकप्रकारचे ध्रुव एकत्र आले तर ते परस्परांपासून अपकर्षित होतात. बाळू आणि प्रसन्न यांच्या नात्यातील या ध्रुवांबद्दलची हि कथा आहे. अल्पवयीन बाळूच्या स्वतःबद्दल असलेल्या जाणीवांची आणि त्याच्या मनातील लालसे मधील द्वंद्वाने या चित्रपटाची कथा आणखीनच रंगते. संदीप मोदी ह्यांचा चुंबक हा पहिलाच चित्रपट आहे. या आधी संदीप यांनी आशुतोष गोवारीकर, राम गोपाल वर्मा, राम माधवानी यांच्या सारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. २०१५ साली संदीप मोदी यांना त्यांच्या ‘बेस्ट फ्रेंड फॉरेवर’ या शैक्षणिक लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार हि प्रदान करण्यात आलेला आहे.

अरुणा भाटिया, नरेन कुमार आणि केप ऑफ गुड फिल्म्स निर्मित, संदीप मोदी दिग्दर्शित आणि अक्षय कुमार प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन केलंय सौरभ भावे आणि संदीप मोदी यांनी. तर मुख्य भूमिकेत आहेत साहिल जाधव, संग्राम देसाई आणि स्वानंद किरकिरे.

           मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.