मराठी सिनेसृष्टी आशयसंपन्नतेच्या बाबतीत सर्वात श्रीमंत – सचिन पिळगावकर

“कोणत्याही सिनेसृष्टीत वर्षाला किती चित्रपट बनतात यापेक्षा त्या सिनेसृष्टीत वर्षाला किती ‘यशस्वी चित्रपट’ बनतात यावर त्या सिनेसृष्टीचं यश अवलंबून असतं.” असं म्हणणं आहे सुप्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगावकर याचं. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पुढे चित्रपटामधील आशयाविषयी प्रश्न विचारला असता सचिन पिळगावकर म्हणाले कि “हिंदीपेक्षा प्रादेशिक भाषांमध्येच आजकाल आशयसंपन्न चित्रपट बनत असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि आशयसंपन्न चित्रपटनिर्मितीच्या बाबतीत मराठी सिनेसृष्टीचा पहिला क्रमांक लागतो.”

सचिन पिळगावकर पुढे असं हि म्हणाले कि, “मराठी साहित्य अतिशय श्रीमंत आहे आणि आतापर्यंत त्यातील फक्त ५ % साहित्यच चित्रपटामध्ये वापरलं गेलेलं आहे. जर सिनेसृष्टीत येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी तसेच आजघडीच्या यशस्वी दिग्दर्शकांनी जर साहित्यामध्ये रुची दाखवून उपलब्ध कथा-कादंबऱ्यामधून वेगवेगळे विषय निवडले, तर उत्कृष्ठ असे आशयघन चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील. तसेच पुस्तक प्रकाशकांच्या बाजारहाटामधील कमजोरीमुळे आणि विरळ होत चाललेल्या वाचन संस्कृतीमुळे जे साहित्य खूप कमी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, ते साहित्य जगभरातल्या प्रेक्षकांसाठी खुलं व्हायला मदत हि मिळेल.”

मराठी चित्रपटांसाठी हा सुवर्णकाळ आहे का ? या प्रश्नाचं उत्तर देताना ते असे म्हणाले कि, “त्यांना हे मान्य नाही कि चांगले चित्रपट फक्त आत्ताच बनत आहेत… मराठी सिनेसृष्टीला चांगल्या आणि दर्जेदार चित्रपटांची परंपरा सिनेसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून आहे.”

“मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो देण्याबाबत केल्या गेलेल्या कायद्यामुळे मराठी चित्रपट व्यसायाला फायदा झाला आहे का?” असे विचारले गेले असता.. सचिनजी म्हणाले कि, “याने आताच्या चित्रपटांना व्यावसायिक फायदा तर नक्कीच झालेला आहे, परंतु जेव्हा मल्टीप्लेक्सच न्हवते तेव्हा हि मराठी चित्रपट सिंगल स्क्रीन थियेटर मध्ये हि रग्गड व्यवसाय करायचे.” सचिन पिळगावकर यांनी स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांच्याच “अशी हि बनवा बनवी” या चित्रपटाचं उदाहरण दिलं. १९८८ साली ५० लाखाहून कमी बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने त्याकाळी १२ ते १३ कोटींचा व्यवसाय केला. म्हणजेच निर्मात्याला निव्वळ नफा ४ कोटीच्या आसपास झाला असावा.

सचिन पिळगावकर यांनी वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात आपलं बालपाऊल ठेवलं होतं. ५६ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कर्तबगारीने हिंदीसोबतच, मराठी सिनेसृष्टीमध्ये हि स्वतःचं असं एक अढळ स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे हे नक्की.

      मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.