मोबाईल दुकानातून वंटास पर्यंत

मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक वास्तवदर्शी चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असतात. शहरी भागातील कलाकारांना त्या भूमिकेत शिरून अभिनय करायला लावण्यापेक्षा अनेकदा त्या त्या भाषेतील, त्या त्या प्रदेशातील लोकं ह्या भूमिकेला चांगला न्याय देऊ शकतात. गेल्या काही वर्षांत आलेल्या अनेक चित्रपटांतून आपल्याला हेच दिसून येतं. गोष्ट छोटी डोंगराएवढी, फंड्री, गाभरीचा पाऊस, सैराट अशा अनेक चित्रपटांची उदाहरणं देता येतील. स्थानिक कलाकारांच्या अभिनयातील मूळ गाभा तसाच ठेवता यावा आणि कमीत कमी कृत्रिमता आणून तो चित्रपट तयार करण्याचा अनेकांचा मानस असतो. असाच एक चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे आणि ह्या चित्रपटाचं नाव आहे ‘वंटास‘.

वंटास हा चित्रपट ग्रामीण भागातील प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या नायकाला लहान असल्यापासून एक मुलगी आवडत असते. जसे ते दोघं मोठे होतात, त्याचं तिच्यावरचं प्रेम अधिकच घट्ट होत जातं. पुढे महाविद्यालयीन जीवनात घडणाऱ्या काही घटना, राजकीय वातावरण, सामाजिक परिस्थिती आणि त्यातून आपल्या प्रेमाला न्याय देण्याचा नायकाचा प्रामाणिक प्रयत्न अशी कथा आपल्या भेटीस येते.

फक्त भकभकीत मेकअप आणि महागड्या कपड्यांत नायक नायिकांना मांडून चित्रपट निर्मिती करण्यापेक्षा वास्तववादी चित्रण करून काळजाला भिडण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो. पटकथा आणि परिस्थिती योग्य असल्याने त्यात कृत्रिमता आणण्याची गरज उरतच नाही.

या चित्रपटाची निर्मिती अमोल बाबुराव लवाटे यांनी केली आहे. कथेचा नैसर्गिक गाभा न हलवता सुंदर दिग्दर्शन केले आहे ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी. या कथेतील रांगडा नायक दिग्दर्शकांना चक्क मोबाईल च्या दुकानात दिसला. निर्माते आणि दिग्दर्शक यांना गावरान बोलीभाषा म्हणू शकणाऱ्या अणि पात्र नैसर्गिक रीत्या वठविणाऱ्या अभिनेत्याला शोधत होते  आणि त्यांना तो सापडला चक्क मोबाईल च्या दुकानात काम करताना आढळला. या अभिनेत्याचं नाव अक्षय माहुलकर असं आहे.तो दर्यापूर येथील एका मोबाईल च्या दुकानात काम करत असे. दिग्दर्शकांनी त्याला तिथेच हेरले आणि अक्षय  माहुलकर ची नियुक्ती बनग्या च्या भूमिकेसाठी झाली. या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका हीना पांचाल करत आहे. ट्रेलर मधून देखील हीना पांचाल आणि अक्षय माहुलकर यांची अप्रतिम केमिस्ट्री दिसून येते आहे.

आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेला अक्षय आता चांगली संधी मिळाल्याने खुशीत आहे. या संधीचे सोने करण्यासाठी तो आतुर झाला आहे.