कादंबरीचा चित्रपट मराठीतही

हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही अनेक  असे चित्रपट येऊन गेले जे कादंबऱ्यांवर आधारीत होते. पिंजरा, श्यामची आई, दुनियादारी ही त्यातीलच काही चित्रपटांची नावे. कादंबरी वर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे. अरुण साधू यांच्या झिपऱ्या या कादंबरीवर आधारित असलेला झिपऱ्या हा चित्रपट २२ जून २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

झिपऱ्या च्या पोस्टर ची धमाल

अरुण साधू यांच्या झिपऱ्या या कादंबरीवर आधारित असलेल्या झिपऱ्या या चित्रपटाच्या पटकथा लेखनाची व दिग्दर्शनाची अशा दोन्ही जबाबदाऱ्या केदार वैद्य यांनी पेलल्या आहेत. पक पक पकाक मधून चित्रपटसृष्टीत आलेल्या सक्षम कुलकर्णी याला छोट्या पडद्यावर मालिका केल्यानंतर आता या चित्रपटात पाहायला मिळेल. बालक पालक आणि टाईमपास फेम प्रथमेश परब देखील आपल्याला या चित्रपटात दिसेल. या चित्रपटात आपल्याला ७२ मैल एक प्रवास फेम चिन्मय कांबळी देखील दिसणार आहे. झिपऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये आपल्याला सक्षम कुलकर्णी, प्रथमेश परब, चिन्मय कांबळी हे तिघेही दिसतात. पोस्टर वरील त्यांच्या प्रतिमा चित्रपटाविषयी वेगवेगळ्या कल्पना देतात .

एक तरुण कशाची तरी वाट बघताना दिसतो, एका तरुणाच्या हातात चर्मकाराकडील साहित्य दिसते तर एक तरुण उभ्या उभ्या धूम्रपान करताना दिसतो आहे व हे तिघेही तरुण रेल्वे स्थानकातील एक फलाटावर दिसत आहेत. हे तिघे तरुण कोण आहेत आणि ते रेल्वे स्थानकावर का आहेत अशा प्रकारचे प्रश्न प्रेक्षकांना पोस्टर बघितल्यावर पडत आहेत त्यामुळे प्रेक्षकांची झिपऱ्या या चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

झिपऱ्या चित्रपटात कोण कोण दिसेल

झिपऱ्या मध्ये सक्षम कुलकर्णी, प्रथमेश परब, चिन्मय कांबळी, अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे , विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे. रणजित दरेकर यांची निर्मिती असलेला झिपऱ्या अश्विनी दरेकर प्रस्तुत करत आहेत त्यांनी याआधी रेगे हा चित्रपट प्रस्तुत केला होता.चित्रपटासाठी गीतलेखन अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी लिहिली असून समित सप्तीसकर आणि ट्रॉय अरिफ यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.  झिपऱ्या साठी विनायक काटकर हे कला दिग्दर्शक, उमेश जाधव हे नृत्यदिग्दर्शक तर राजेश नादोने हे डीओपी आहेत.या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, वेशभूषा आणि कलादिग्दर्शन यासाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत तर उत्कृष्ट चित्रपट व नृत्यदिग्दर्शनासाठी नामांकने घोषित झाली आहेत.