रेडूचं पोस्टर झालं हिट

शीर्षक : कथा, कादंबरी ,नाटक ,चित्रपट ,विविध वाहिन्यांवरील मालिका या व अशा अनेक  गोष्टींमध्ये कथानका इतकंच महत्त्व शीर्षकाला असते.  शीर्षक हे ती गोष्ट कशाबद्दल आहे , त्यातून कोणत्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे या बद्दल कल्पना देते. चित्रपटाच्या शीर्षकाच्या बाबतीतही हेच आहे. चित्रपटाला शीर्षक हे महत्वाचे आहे आणि गरजेचे देखील आहे. चित्रपटात कितीही तगडी कलाकार मंडळी असली तरीही चित्रपट मात्र त्या शीर्षकावरूनच ओळखला जातो. चित्रपटाचे शीर्षक हे आपल्याला चित्रपटाबद्दल माहिती देते. चित्रपटात काय मांडले आहे याचा थोडक्यात  आढावा आपल्याला शीर्षकाच्यामाध्यमातून घेता येतो, त्यामुळे चित्रपटाच्या बाबतीत शीर्षक जास्त भाव खाऊन जाते.

चित्रपटाचे शीर्षक – रेडू

चित्रपटाच्या प्रसिद्धी च्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका हे शीर्षकच बजावते. त्यामुळे आधी चित्रपटाचे शीर्षक प्रसिद्ध केले जाते आणि मग पोस्टर आणि मग ट्रेलर प्रदर्शित केला जातो. चित्रपटाचे शीर्षक प्रेक्षक वर्गात एक वेगळाच उत्साह निर्माण करतो आणि याचा फायदा त्यांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर होतो. असेच काहीसे रेडू या चित्रपटाच्या बाबतीत घडले आहे. सागर छाया वंजारी यांनी रेडू या चित्रपटाचे संकलन व दिग्दर्शन करण्याची दुहेरी जबाबदारी पेलली आहे. या चित्रपटाचे नाव जाहीर झाल्यानंतर त्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले गेले. सर्वसामान्य माणसांपासून अगदी नामवंत कलाकारांनी सुद्धा आपले डोके लढवीत या चित्रपटाच्या नावाचा म्हणजेच रेडू या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लावले.

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट आणि भाऊ कदम यांना रेडू म्हणजे रेड्याचे पिल्लू वाटत आहे ,तर रेडू स्टेडू गो असा मजेशीर अर्थ सारंग साठ्ये याने सांगितला.रसिका सुनील हिला रेडू हे एखाद्या प्राण्याचे नाव वाटले आणि अमेय वाघ याने तर वेगळाच अर्थ लावला.त्याच्या मते रेडू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला असावा.

अमेय वाघ याने संगितले की रेडिमेड आणि ड्युप्लेक्स हे ते दोन शब्द असावेत ज्या शब्दांच्या पहिल्या अक्षरांचा वापर करून रेडू हा शब्द तयार करण्यात आला आहे. जरी असे वेगवेगळे आणि भन्नाट अर्थ लावण्यात आले असले तरीही रेडू चा अर्थ मात्र वेगळाच आहे. तो म्हणजे रेडिओ.

रेडू चित्रपटाचे पोस्टर

सोशल नेटवर्किंग साईट्स च्या माध्यमातून नुकतेच रेडू या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले. यात एक माणूस चालताना दिसत असून त्यात त्याच्या धडावर चेहऱ्याच्या जागी एक जुन्याकाळातील रेडिओ दिसत आहे. यातून एक शंका तर सुटली आहे की रेडू म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून एक रेडिओ आहे.रेडू या चित्रपटात मालवणी भाषेचा वापरही करण्यात आला असल्याने एकूणच चित्रपट हा मालवणी मनोरंजनाचा तडका देऊन जाईल असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटत आहे.