स्टार प्रवाह चा ऋत्विक केंद्रे आता मोठ्या पडदयावर

आज अनेक युवा कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. असे असले तरीही चित्रपटसृष्टीत सगळेच आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतातच असे नाही. मराठी असो किंवा हिंदी परंतु चित्रपटसृष्टीत आपली स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करणे हे सोप्पे काम नाही. काही कलाकार हे प्रथम मालिकांमधून पदार्पण करतात व त्यांनतर चित्रपटसृष्टीकडे वळतात. याचेच एक उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे व अभिनेत्री गौरी केंद्रे यांचा मुलगा ऋत्विक केंद्रे.

मालिका

स्टार प्रवाह या वाहिनीवरून दाखवल्या जाणाऱ्या ‘मानसीचा चित्रकार तो‘ या मालिकेतून ऋत्विक केंद्रे हा नवा चेहरा प्रथम छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांसमोर आला.मानसीचा चित्रकार तो ही मालिका शैलेश शिरसेकर यांनी दिग्दर्शित केलेली.या मालिकेत ऋत्विक केंद्रे व अक्षया गुरव हे दोघे नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या मालिकेत ऋत्विक ने विहान ची भूमिका केली होती. ही मालिका २०१३ साली स्टार प्रवाह या वाहिनीवर दाखवण्यात येत होती.

नाटक

मालिकेसाठी अभिनय करण्याआधीही ऋत्विक याने त्याच्या महाविद्यालयतील अनेक नाटकांत काम केले होते.यांत मराठी बरोबरच इंग्रजी व गुजराती भाषेतील नाटकांचाही समावेश होता. लुक्का छुपी, मेरा बेटा चोर है, वो चार पन्ने  या हिंदी नाटकांत ऋत्विकने अभिनय केला होता. ऋत्विक केंद्रे याचा सहभाग जयंतीलालनी सायकल  या गुजराती नाटकात व गोची शाकुंतल  या इंग्रजी नाटकातही होता. ऋत्विकच्या रंगभूमीवरील करिअर ची सुरुवात झुलवा  या प्रायोगिक नाटकापासून झाली .सध्या ऋत्विकचे मोहें पिया हे हिंदी नाटक देशभरात गाजत आहे.

चित्रपट

पांडुरंग जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ड्राय डे‘ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ऋत्विकने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ऋत्विक केंद्रे आणि मोनालीसा बागल ही फ्रेश जोडी या चित्रपटातून आपल्या भेटीला आली होती. ऋत्विक चा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऋत्विक केंद्रे याच्या या आगामी चित्रपटाचे नाव सरगम असे आहे. ऋत्विक याने त्याच्या फेसबुक च्या खात्यावरून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले . चित्रपटाच्या एक पोस्टर वर आपल्याला ऋत्विक च्या हातात कॅमेरा दिसतो तर दुसऱ्या पोस्टर मध्ये ऋत्विक हा कॅमेऱ्याच्या मागे दिसतो आहे.या चित्रपटात ऋत्विक प्रमुख भूमिकेत आहे परंतु त्याच्या या भूमिकेविषयी कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही. सरगम या चित्रपटाच्या पोस्टर वरील चित्रात ऋत्विक केंद्रे याच्या हातात कॅमेरा आहे त्यामुळे या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमधील उत्सुकता ताणलेली आहे.