सैराट ठरला पहिला 100 नंबरी चित्रपट

सैराट हा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेला एकमेव मराठी चित्रपट ठरला. एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. फार छोट्या प्रमाणावर निर्माण केलेला हा चित्रपट अनपेक्षित रित्या यशस्वी ठरला.

या यशात मोलाचा वाटा होता तो म्हणजे उत्तम दिग्दर्शन आणि कलाकारांची तेवढ्याच ताकदीची साथ. नागराज पोपटराव मंजुळे यांच्या दमदार दिग्दर्शनाला प्रमुख भूमिकेत असलेल्या रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी चांगलीच धार चढवली. अभिनयातील सहजता आणि भाषेतील साधेपणा यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना अगदी आपल्या जवळचा वाटला. या चित्रपटातून नागराज मंजुळे यांनी हॉनर किलिंग चे ज्वलंत वास्तव आर्ची आणि परश्या च्या कथेतून मांडले आहे.

या चित्रपटाने मराठी चित्रपटांचे अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाचे प्रदर्शन महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, कोलकाता, भिलाई, रायपूर,भिवनी, कर्नाटक, तेलंगणा अशा अनेक ठिकाणी सबटायटल बरोबर करण्यात आले होते. महाराष्ट्रा बाहेरही या चित्रपटाचे अनेक खेळ हाऊसफुल्ल झाले होते. या चित्रपटाचे प्रदर्शन 450 पेक्षा जास्त सिनेमगृहांमध्ये केले गेले.

इतकेच नव्हे तर या चित्रपटाच्या बेसुमार प्रसिद्धीमुळे साताऱ्यात पहाटे 3 वाजताचा चित्रपटाचा अजून एक खेळ सुरू केला गेला. ही घटना साताऱ्यातील रहिमतपूर येथे घडली होती. या व्यतिरिक्त भारतात 200 पेक्षा जास्त ठिकाणी हा सिनेमा सबटायटल सहित प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट भारतात तर सुपरहिट झालाच पण युएई आणि दक्षिण कोरिया मध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला.

प्रसिद्धी बरोबरच सैराट या चित्रपटाने गल्ल्यावरही चांगलीच कमाई केली. पहिल्याच आठवड्यात सैराट ने 25.5 करोडची कमाई केली. पहिल्याच दिवशी 3.60 करोड ची कमाई करून या चित्रपटाने खाते उघडले. दुसऱ्या दिवशी 3.95 करोड आणि तिसऱ्या दिवशी 4.55 करोड कमविले. पहिल्या वीकेंड ला 12.10 करोड तर दुसऱ्या वीकेंड ला 12.57 करोड ची कमाई सैराट ने बॉक्स ऑफिसवर केली. दहा दिवसांत 38 करोड आणि 15 दिवसांत 52 करोड ची कमाई केली. 3 आठवड्यात 65 करोड ची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला. चौथ्या आठवड्यापर्यंत चित्रपटाचे 525 खेळ होणारा आणि 100 करोड ची कमाई करणारा पहिला आणि एकमेव मराठी चित्रपट ठरला. भारताबाहेर तर 22 हजार डॉलर चा गल्ला या चित्रपटाने गोळा केला. इतक्या प्रमाणात व्यावसायिक यश मिळविणारा देखील हा पहिला मराठी चित्रपट ठरला.