सैराट फँड्रीच्याही आधीचा

दोन वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीत एक असा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने सगळे विक्रम मोडीत काढले आणि मोडायला अशक्यप्राय असे नवीन विक्रम रचले. हा चित्रपट म्हणजे अर्थातच सैराट‘. नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित आणि निखिल साने निर्मित या चित्रपटाने सातासमुद्रापार आपली जादू दाखविली. भारतातही केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांचंही मन या चित्रपटाने जिंकलं. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या विनासायास अभिनयाने गाजलेल्या या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे यांनी काही खुलासा केला.

नागराज मंजुळे म्हणाले की सैराट ची कथा त्यांच्या डोक्यात 2008 पासूनच होती. ते स्वतःच त्या कथेवर काम करत होते. पण त्या कामाने त्यांचं समाधान होत नव्हतं आणि म्हणून त्यांनी ती स्क्रिप्ट त्या वेळी निश्चित केली नव्हती. मंजुळे हे कायम समीक्षकांच्या नजरेतून चित्रपट बघतात. त्यांच्या मते असं केल्याने चित्रपटाचे विविध पैलू आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्या वेळी त्यांचं ठरलं नव्हतं की त्यांना चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरायचं आहे. ते केवळ एक कथा लिहीत होते. मग यांना अजून वेगळी कल्पना सुचली आणि फँड्री चित्रपट तयार झाला.

फंड्री चा अनुभव त्यांना खूप शिकवून गेला आणि त्यातली महत्त्वाची शिकवण ही होती की जर चांगली कथा तुम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन याल तर त्या चित्रपटाचं मनापासून स्वागत होतंच. फंड्री च्या यशानंतर मंजुळे पुन्हा एकदा सैराट च्या कथेवर काम करायला लागले आणि ती कथा घेऊन वेगवेगळ्या निर्मात्यांना भेटले. मराठीतल्या एका नामवंत निर्मात्यांनी सैराट ची धुरा सुरुवातीला बोलावून देण्यात आली. पण अनेक वेळा त्यांच्यात आणि मंजुळे यांत मतभेद झाले

चित्रपटाचा नैसर्गिक पैलू जपण्यासाठी मग मंजुळे यांनी त्या निर्मात्यांबरोबर काम करणं थांबवलं. मग निखिल साने यांनी या चित्रपटाची सूत्र स्वीकारली. सानेंबरोबर मंजुळे यांचे क्वचितच काही मतभेद झाले ज्यामुळे एकत्र काम करणं सोपं झालं.

मंजुळे यांना सरळसोट बॉलीवूड नायिकांच्या साच्याबाहेरची मुलगी आर्चीमध्ये दाखवायची होती. त्यांच्या मते मुली खऱ्या आयुष्यात इतक्या दुर्बल नसतात जितक्या बॉलीवूड च्या अभिनेत्री दाखवल्या जातात. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अनेक धीट आणि धडाकेबाज स्त्रिया बघितल्या आहेत आणि त्यांना त्याची सांगड आर्ची मध्ये घालायची होती. कल्पना आणि वास्तव यांचा सुरेख संगम त्यांनी आर्ची मध्ये केलं.