श्री श्री रविशंकरांना मंत्र पसंत

सुमारे 20-30 वर्षांपूर्वी मराठीत अनेक धार्मिक विषयांवरील चित्रपट आले होते. अनेक जणांनी आपल्या श्रद्धास्थानांवर आधारित मूळ सत्यकथा किंवा दंतकथा रुपेरी पडदयावर मांडल्या. अनेक देवी देवता आणि त्यांच्या अवतारांशी निगडित असे हे चित्रपट होते. अलीकडच्या काळात मात्र अशा चित्रपटांचं प्रमाण कमी झालं आहे. त्यातही रहस्यमय किंवा वैज्ञानिक कथा धार्मिक कथेबरोबर मांडली जाऊ लागली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘देऊळ बंद’. आधुनिक धार्मिक चित्रपटांच्या गटात मोडणारा असा हा एकमेव चित्रपट होता. पण आता त्यात अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. तो म्हणजे ‘मंत्र’. हा चित्रपट चर्चेत येण्याचं एक कारण म्हणजे या चित्रपटाला मिळालेली श्री श्री रविशंकर यांची पसंती. नुकतंच या चित्रपटाचं विशेष प्रदर्शन श्री श्री रविशंकर उपस्थितीत झालं.बेंगलोर येथे झालेल्या या विशेष प्रदर्शनात श्री श्री रविशंकर यांनी मंत्र हा चित्रपट आपल्या काही भक्तांबरोबर बघितला. मंत्र या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी श्री श्री रविशंकर यांनी तो एका वेळेस सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणं हीच मोठी गोष्ट होती. कारण या आधी कधीच रविशंकर यांनी एका वेळेस पूर्ण चित्रपट पाहिला नाहीये. याआधी त्यांनी काही हिंदी चित्रपट पाहिले आहेत पण ते एका बैठकीत पाहिले नव्हते. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते भारावून गेले होते.

श्री श्री रविशंकर यांनी चित्रपटाचं कौतुक तर केलंच पण त्याचबरोबर त्यांना चित्रपटाचं संगीतही भावलं. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक विश्वजीत जोशी यांचं त्यांनी अधिक कौतुक केलं. मंत्र हा चित्रपट एक आस्तिक आणि एक नास्तिक आशा दोन व्यक्तींच्या आयुष्याबद्दल आहे.


या चित्रपटाची निर्मिती संजय काटकर यांनी केली आहे तर दिग्दर्शन देवेंद्र शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटात आपल्याला मनोज जोशी, दीप्ती देवी, अनुराधा मराठे, संजय जाधव, सौरभ गोगटे, वृषाली काटकर, राजेश काटकर, सुनील अभ्यंकर, पुष्कराज चिरपुटकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि धीरेन जोशी असे नवीन आणि जुने दोन्ही चेहरे दिसतील. हा चित्रपट श्री श्री रविशंकर यांना दाखवणं हा ग्राहकांच्या पसंतीच्या परिक्षेचाच एक भाग होता. हा चित्रपट अभिप्रायासाठी आधी शर्मन जोशी, मधुर भांडारकर आणि राजदत्त आशा दिग्गजांना दाखविला आहे. बरेचदा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कोणतीही गोष्ट बाहेर बाजारात आणण्यापूर्वी आशा प्रकारची ग्राहकांच्या पसंतीची परीक्षा केली जाते. इतकेच नव्हे तर या चित्रपटाचे प्रदर्शन या आधी गोवा फ़िल्म बाजार आणि पुणे चित्रपट महोत्सवात झाले आहे.