सैराट ची सक्सेस स्टोरी

चित्रपटाचं यश म्हणजे तरी नक्की काय असतं? गल्ल्यावर कमी दिवसात भरपूर कमाई होणे? लोकांनी परत परत तोच चित्रपट बघणे? त्या चित्रपटाला नेहमीचे खेळ कमी पडतात की काय म्हणून पहाटेचा आणखी एक खेळ सुरू होणे? चित्रपट दुसऱ्या भाषांमध्ये तयार होणे? सबटायटल सहित चित्रपट बघूनही हो बहुभाषिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे? चित्रपटाच्या यशाचं कोणतंही परिमाण समोर ठेवा आणि बघा, सैराट ने ते पार केलं आहे. सैराट हा नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित 2016 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट. यात प्रमुख भूमिकांमध्ये आपल्याला आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू दिसतात. सैराट ने अल्पावधीत गल्ल्यावर 100 करोड ची कमाई केली आणि शंभर नंबरी क्लब मधला तो एकमेव मराठी चित्रपट ठरला. साताऱ्यात एका चित्रपटगृहात सैराट चा खेळ पहाटे 3 वाजता देखील ठेवण्यात आला होता.

सैराट ची पुनर्निर्मिती कन्नडा, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या चारही दाक्षिण्यात भाषांमध्ये होते आहे. त्याचबरोबर गुजराती भाषेतील रिमेकच्या चर्चा सुरू आहेत. करण जोहर धडक च्या रुपात हिंदी रिमेक आपल्या समोर घेऊन येतो आहे. सैराट ने सातासमुद्रापार अगदी दुबई आणि कोरिया मध्ये देखील आपली जादू दाखविली.

पण अनेकांना प्रश्न पडणार असेल की सैराट च्या यशामागचं कारण नक्की काय असावं. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांच्या मनावरही या चित्रपटाने गारुड घातलं. समीक्षकांच्या मते कोणत्याही चित्रपटामध्ये एखादी सामायिक गोष्ट आणि निर्मात्यशी निगडित एखादी वैयक्तिक बाब यांची उत्तम सांगड जमली तर चित्रपट यशस्वी होतो. जातीयवाद आणि निगडित समस्या हा विषय महाराष्ट्रात किंवा भारतात सुद्धा नवीन नाहीये. पण निर्मात्याने स्वतःला त्या भूमिकेत बघणं आणि यामुळे चढलेला साज काळजाला भिडून जातो.

जेव्हा मराठी चित्रपट अमराठी प्रेक्षकांना दाखविला जातो, त्याचं यश 5 बाबींवर ठरतं. पहिली गोष्ट म्हणजे अभिनेत्यांचा वास्तववादी आणि नैसर्गिक अभिनय. दुसरी गोष्ट म्हणजे बोलीभाषा आणि अभिनयातील सहजता जी अमराठी प्रेक्षकांनाही आपलीशी वाटते. चित्रपटातील  निःशब्द करणारी आणि विचार करायला भाग पडणारी भयाण शांतता हा तिसरा मुद्दा होय.चौथा मुद्दा म्हणजे सबटायटल केवळ भाषांतर न राहता भावनिक दृष्ट्या अचूक असणं. पाचवा मुद्दा म्हणजे अर्थातच संगीत आणि पार्श्वसंगीत. पार्श्वसंगीतामुके तयार होणारी वातावरण निर्मिती सैराट मध्ये अचूक प्रकारे झाली आहे. या पाचही मुद्द्यांवर भक्कम असल्याने सैराट ने मराठी प्रेक्षकांबरोबर अमराठी प्रेक्षकांचं मनही जिंकलं.