सुखविंदर सिंह मराठीत

बॉलीवूड चे गायक गायिका आणि मराठी चित्रपट ही समीकरणं काही नवीन नाहीयेत. कितीतरी बॉलीवूड च्या पार्श्वगायकांनी मराठी चित्रपटांसाठी गायन केले आहे. श्रेया घोषाल, सोनू निगम, कुणाल गांजावाला, शंकर महादेवन यांसारख्या अनेक गायकांनी मराठी गाणी गाजविली आहेत. आता या गायकांच्या मांदियाळीत भर पडली आहे ती म्हणजे सुखविंदर सिंह यांची. सुखविंदर सिंह यांनी आगामी राजा या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. या चित्रपटाच्या संगीत उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. या सोहळ्यात राजकारण, पोलिस, प्रशासनिक सेवा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

सुखविंदर सिंह भारतीय पार्श्वगायक आहेत. त्यांनी आपल्या गायनाची कारकिर्दीत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांना खरी ओळख मिळाली ती मणी रत्नम यांच्या दिलसे रे या चित्रपटातील छईया छईया गाण्यामुळे. या गाण्यासाठी त्यांना त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्काररही मिळाला.

त्यांनी बाजीराव मस्तानी, दबंग, स्लमडॉग मिलेनियर, सुलतान, तमाशा, टायगर जिंदा है, दिल धडकने दो, एक था टायगर, रांझणा, अग्निपथ, कहानी, तीस मार खान यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. त्यांना स्लामडॉग मिलेनियर मधील जय हो या गाण्यासाठी अकादमी पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाला आहे. 1986 पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली आहे जी 30 वर्षांपेक्षाही जास्त लांब आहे.

चित्रपटाची कथा पॉप सिंगरच्या जीवनावर आधारीत आहे आणि म्हणूनच या संगीताच्या चित्रपटात वेगळ्या शैलीतील आठ गाणी आहेत. गावाकडून शहराकडे अनेक स्वप्नं घेऊन येणाऱ्या मुलांची कथा या चित्रपटात मांडली आहे. सुखविंदर सिंह यांच्याव्यतिरिक्त इतर गायकांनी या चित्रपटासाठी त्यांच्या आवाजात गाणी गायली आहेत. शान, उदित नारायण, रोहित राऊत, सौरभ साळुंखे, उर्मिला धनगर, सयाली पादुघान आणि मिलिंद शिंदे ह्या गायकांनी गायलेली गाणीही या चित्रपटात दिसतील. पंकज पडघन यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटात सौरदीप कुमार, स्वरदा जोशी आणि निशीता पुरंदरे यासारखे नवीन चेहरे आपल्या भेटीला येतील. त्याचबरोबर शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंदे आणि पौरस यांसारखे अष्टपैलू कलाकार दिसून येतील. या चित्रपटाची निर्मिती  प्रवीण काकड यांनी केली आहे. आणि शशिकांत देशपांडे यांच्या अचूक दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात 25 मे, 2018 रोजी प्रदर्शित केला जाईल.