वर्षभरानंतरही सैराट ची जादू कायम

दरवर्षी काही मराठी दिग्दर्शक असे काही सिनेमे घेऊन येतात की मराठी सिनेमा कात टाकतोय या वाक्यावर आपला विश्वास बसल्याशिवाय रहात नाही. गेल्या वर्षी असाच एक चित्रपट आपल्या भेटीला आला तो म्हणजे सैराट.

नागराज पोपटराव मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीचा टर्निंग पॉईंट ठरला. फँड्री या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर नागराज मंजुळे यांच्या नावाची हवा निर्माण झाली होतीच. ज्वलंत विषय पडदयावर अत्यंत बारकाईने हाताळणारा दिग्दर्शक म्हणून त्यांचा गवगवा झाला होता.  सैराट ने ती हवा आणि तो गवगवा सार्थ करून दाखवला. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांची गावरान बोलीभाषा आणि रांगडा अभिनय यांमुळे हा चित्रपट वास्तववादी ठरला. धगधगणारा विषय आणि परिस्थितीचे अचूक चित्रण यांमुळे या चित्रपटाला आणखीनच धार चढली. हॉनर किलिंग च्या विषयावर चपखल बसणारी कथा लोकांचं मन जिंकणारी ठरली.

हा चित्रपट इतका यशस्वी होईल अशी अपेक्षा खुद्द निर्मात्यांनाही नव्हती. पण कुठलाही कृत्रिमपणा नसलेली ही कलाकृती मनापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि अर्थातच त्याची कारणंही तशीच आहेत. सैराट ची पटकथा हा चित्रपटाच्या यशातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. काळजीपूर्वक केलेले वर्णन आणि जमेल तितका नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न यामुळे ती कथा आपल्यातलीच एक वाटते.

अनावश्यक साहसदृश्ये, भपकेबाजपणा यांना वगळून आवश्यक तितकेच बारकाईने मुद्दे मांडल्याने हा चित्रपट कृत्रिम वाटत नाही. आपल्या आसपासच कुठेतरी घडत असल्याची भावना आपल्या मनात हा चित्रपट बघताना राहते. भारंभार गाण्यांचा भडिमार करण्यापेक्षा आवश्यक तिथे संगीताचा चपखल वापर केला आहे. यामुळेच सैराट च्या झिंगाट या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. लोककलेतील चालींचा मिश्र वापर करून तयार केलेलं संगीत लक्षवेधी आहे. वर्षभरानंतरही या गाण्याची जादू तसूभरही कमी झालेली नाही.

सैराट च्या कथेतील प्रगल्भता आणि संपूर्ण चित्रपटातील नैसर्गिक बाजू यांमुळे या चित्रपटावर आधारित दुसऱ्या भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती होत आहे. गेल्या काही महिन्यांत अश्या चर्चा होत्या की दाक्षिण्यात भाषांमध्ये सैराट चा रिमेक होणार. धडक हा करण जोहर चा आगामी चित्रपट सैराट च्या कथानकावर आधारित आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत दिसतील. बॉलीवूड अत्यंत आतुरतेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट बघत आहे. एकंदरच सैराट ने सगळ्या सिनेसृष्टीला ‘याड लावलं’ यात काही शंका नाही.