श्री श्री रविशंकर यांनी पाहिला मराठी चित्रपट – मंत्र

ड्रीमबूक प्रॉडक्शन्स आणि वेदार्थ क्रीएशन्सचा पहिलाच मराठी चित्रपट ‘मंत्र’ १३ एप्रिलला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. वेदार्थ क्रिएशन्सची स्थापना  आयटी क्षेत्रातील अनुभवी तंत्रज्ञ राजनीश कलावंत, देवेंद्र शिंदे आणि सचिन पंडित यांनी केली. बंगलोरला श्री श्री रविशंकर आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी ‘मंत्र’ या मराठी सिनेमाचा एक खास शो झाला. गुरुजींनी पाहिलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे.

सिनेमा पूर्ण झाल्यावर या टीमने त्याच्या विषयाच्या तज्ज्ञ लोकांकडून तपासून घेण्याचे (आयटीच्या भाषेत ‘user acceptance testing’) ठरवलं. गोव्याला फिल्म बझार मध्ये त्याचे प्रदर्शन झाले. पुढे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावातही ‘मंत्र’ ची निवड झाली. दोनही ठिकाणी चित्रपटाला समीक्षकांची आणि प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली

श्री श्री रविशंकर हे आजच्या काळातले अध्यात्मिक विषयावरचे गुरु, चित्रपटात हा विषय हाताळला असल्याने त्यांना हा सिनेमा दाखवण्यात आला.  त्यांनी आत्तापर्यंत पाहिलेले हिंदी चित्रपटही थोडा आज थोडा उद्या करत पाहिले पण विशेष म्हणजे गुरुजींनी हा चित्रपट एकाच बैठकीत पहिला. त्यांना आणि त्यांच्या अनुयायांनाही चित्रपट आवडला.

जागेवरच गुरुजींनी विश्वजीत जोशींना संगीतासाठी शाबासकी दिली, हा शो म्हणजे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमाचं करवून घेतलेलं  ‘Customer Acceptance Testing’ होतं, जी प्रॅक्टीस आयटी कंपनी पाळतात. याचं उद्दिष्ट असतं कि आपण जी गोष्ट ज्याच्यासाठी तयार केली आहे तो कस्टमर  तांत्रिक आणि विषयाच्या (उपयुक्ततेच्या) दृष्टीने आपल्या कामावर समाधानी आहे कि नाही ते पाहणं.

त्यानंतर विविध धर्माच्या अधिकारी व्यक्तींना आणि चित्रपट सृष्टीतील जाणकारांनाही सिनेमा दाखवण्यात आला. मधुर भांडारकर, शर्मन जोशी, दिग्दर्शक राजदत्त  आदिंनी हा चित्रपट खूप संवेदनशील विषयावर असूनही अत्यंत संतुलित आणि मनोरंजक असल्याची प्रतिक्रिया दिली.

हर्षवर्धन लिखित दिग्दर्शित ’मंत्र’ मध्ये मनोज जोशी, दीप्ती देवी, पुष्कराज चिरपुटकर, सिद्धेश्वर झाडबुके, सुनील अभ्यंकर, धीरेश जोशी, राजेश काटकर  अशा कसलेल्या कलाकारांबरोबरच  सौरभ गोगटे, शुभंकर एकबोटे, सुजय जाधव, वृषाली काटकर आणि अनुराधा मराठे यांसारखे नवीन चेहरेही दिसणार आहेत. मंत्रच्या फेसबुक पेजवर या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी  आणि चित्रपट पाहिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय पाहायला मिळतात