मिताली, सिद्धार्थ आणि इंस्टाग्राम

फेब्रुवारी महिना संपला तरी मराठी सिनेसृष्टीतील प्रेमाचा वसंत फुलतोच आहे. गेल्या वर्षीच अमेय वाघ, प्रार्थना बेहेरे, श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर अशा कलाकारांनी लग्नगाठी बांधल्या आणि आपल्या प्रेमाच्या माणसाबरोबर सहजीवनाची सुरुवात केली. त्याच्याबद्दलच्या चर्चा संपत नाहीत तोच, मराठी चित्र सृष्टीत आणखी एका जोडीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

बरेचदा कलाकार विविध मालिका आणि चित्रपटांच्या सेट वर भेटतात आणि तिथून त्यांच्या मैत्रीची सुरुवात होते. अनेकजण मैत्रीच्या नात्याचं प्रेमात रुपांतर करतात. अशा जोड्यांमध्ये आता आणखी एका जोडीची भर पडली आहे, ती म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. यंदाच्या व्हेलेन्टाइन दिवशी त्यांनी सोशल मिडिया वर आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यांचे चाहते ही बातमी ऐकून प्रचंड खुश आहेत. अनेकांनी त्यांच्या फोटोवर त्यांना शुभेच्छा दिल्या.

Siddharth And Mitali

मिताली २१ वर्षांची नवोदित अभिनेत्री आहे. मुळची ठाण्याची असलेली ही मुलगी सर्वप्रथम ‘बिल्लू’ या हिंदी सिनेमातून बालकलाकार म्हणून पुढे आली. त्यानंतर तिने अभिनयाकडे वाट वळवली. रुईया महाविद्यालयात शिकताना तिने अनेक एकांकिकांमधून कामे केली आणि अनेक पुरस्कार मिळविले.

त्याच वेळी तिने उंच माझा झोका, तू माझा सांगाती, असंभव, भाग्यलक्ष्मी अशा अनेक मालिकांमध्ये कामे केली. सध्या तिची झी युवा वरील फ्रेशर्स ही मालिका गाजत आहे.

सिद्धार्थ मुळचा पुण्याचा असून तो आता कामाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाला आहे. सिद्धार्थ ने वयाच्या १९ व्या वर्षी झेंडा या चित्रपटातून खरी अर्थाने पदार्पण केलं. पण त्याही आधी, त्याने कवडसे या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे. क्लासमेट्स, सतरंगी रे, बावरे प्रेम हे, ऑनलाईन बिनलाइन, वजनदार, गुलाबजाम या चित्रपटात कौतुकास्पद भूमिका केल्या आहेत. त्याचव सूत माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील हिच्याशी जुळले असल्याच्या चर्चा चालू होत्या. पण त्याने मिताली बरोबरचा फोटो टाकून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पण खरी बातमी तर याहीपुढे आहे. या प्रेमी युगुलाने आपल्या हातावर सारखाच टॅटू गोंदवला आहे. टॅटूच्या नक्षीसाठी त्यांनी इन्स्टाग्राम चा लोगो निवडला आहे. कदाचित त्यांच्या प्रेमाची सुरुवात इन्स्टाग्राम वरून झाल्याने त्यांनी हा लोगो निवडला अश्या चर्चा आहेत. सिद्धार्थ च्या गुलाबजाम या चित्रपटावर मितालीने पत्रकारांना खास प्रतिक्रिया  दिल्या आणि त्याचे कौतुक केले. नुकतेच हे दोघेही गोव्याला सहलीला जाऊन आले. त्या दोघांनीही समुद्रकिनार्यावरील फोटो तसेच मासळीच्या जेवणाचे फोटोही टाकले आहेत. एकंदर काय, यांची प्रेमाची गाडी भरधाव चालू आहे तर!